बागेश्वर धामचे पीठाधीश महंत धीरेंद्रकृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. यानंतर देशभरातून साईभक्तांकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
साईबाबांविषयी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, हिंदू धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देव मानले नाही. बागेश्वर धाम बाबांनी वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, सिंहाचे कातडे पांघरून कोणी गिधड सिंह बनू शकत नाही. या विधानाने साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांना धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागावी अशी मागणी केली होती. कृष्ण शास्त्री म्हणाले होते की, साईबाबा संत असू शकतात पण त्यांना देव म्हणता येणार नाही. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यावरून खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांनी आता या विधानाबद्दल माफी मागितली आहे.
महंत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मला संत आणि महापुरुषांबद्दल नेहमीच आदर आहे आणि तो कायम राहील. मी एक म्हण सांगितली, मी माझ्या मागे छत्री ठेवून स्वतःला शंकराचार्य आहोत असे म्हटले तर हे कसे होईल? असं विधानही त्यांनी केले आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, शंकराचार्यांनी जे सांगितले होते, त्याचा आम्ही पुनरुच्चार केला. साईबाबा संत-फकीर असू शकतात आणि लोकांची त्यांच्यावर श्रद्धा असू शकते. जर संतांना कोणी देव मानत असेल तर ती त्यांची वैयक्तिक आस्था आहे. यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मात्र माझ्या बोलण्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मला मनापासून खूप वाईट वाटते.