तेजा मुळ्ये , रत्नागिरी
म्हणायचं झालं तर सांजवेळ हा शब्द आयुष्यासाठी म्हणजेच आपल्या काळासाठी किंवा दिवसातील एक वेळ असाही वापरता येईल. काय असतं ना आपण आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
आज वयाच्या साठी कडे जाताना काही व्याधी जेव्हा आपल्याला जाणीव करून देतात तेव्हा, आपले शरीर क्षीण व्हायला लागतं. अशा वेळेला आयुष्याच्या सायंकाळी आपली वाटचांल सुरू झाली याची जाणीव व्हायला लागते. काय असते ही सायंकाळ?
आपल्यातूनच आपलं आयुष्य आपण वजा केल्याची जाणीव आणि राहिलेले आयुष्य कसं असेल याची चिंता नाही म्हणता येणार थोडी काळजी घ्यावी अशी आलेली समज. सरून गेलेल्या आयुष्यात खूप गोष्टी, मला करायचे आहे त्या मी केल्या असे म्हणण्यापर्यंत आपण करत असतो आणि जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण कर्ता असतो, काळज्या फार कमी असतात धडपडण्याची ताकद असते. जेव्हा हळूहळू सांजवेळ येऊ लागते तेव्हा आपण कर्म ओळखू लागतो हे वास्तव आहे. ते कोणाला चुकलं आहे?
साठीपर्यंत आपण उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थाआत्मसात केलेल्या असतात त्यामुळे जे झालं ते लयाला जाणार हे वास्तव आहे हे स्वीकारून गत आयुष्याचा नकळत हिशोब मांडू लागतो. हीच ती सांजवेळ! संधिप्रकाश पडू लागतो. आपल्याच आयुष्यातील महत्त्वाचे क्षण त्या प्रकाशात सोनेरी होऊन उजळतात आपण त्यात रमून जातो आणि काहीवेळा निसटून गेलेले क्षण जगण्याचाही विचार तरळून जातो.
गोड छान सांज्या सारखी ही सांजवेळ आपण समजून घ्यायला हवी.