(सांगली)
सांगली शहरामधील मार्केट यार्डातील रिलायन्स ज्वेल्समध्ये गोळीबार करत दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली आहे. या थरारक घटनेमुळं सांगली शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपी चोरट्यांनी रिलायन्स ज्वेल्समधील कर्मचाऱ्यांना बांधून ज्वेलर्सवर दरोडा टाकला आहे. याशिवाय संपूर्ण रिलायन्स ज्वेल्स लुटण्यात आल्यानंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्समध्ये रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर शिरले. ज्वेलर्समध्ये गोळीबार करत चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ज्वेलर्समधील सर्व दागिने तसेच रोख रक्कम ताब्यात घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. आरोपींनी ज्वेलर्समधील पाच कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
दरोडेखोरांनी रिलायन्स ज्वेल्समधील सर्व दागिने आणि रोकड लंपास केल्यानंतर फरार होताना गोळीबार केला. त्यामुळं ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नाकेबंदी केली आहे. याशिवाय मार्केट यार्डासह रिलायन्स ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं सांगली शहर पोलिसांनी सांगितलं आहे.