(सांगली)
मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावातील अंबिकानगर येथे एकाच कुटुंबातील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या खासगी सावकाराच्या छळामुळे झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावातील अंबिकानगर भागात राहणारे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक येल्लाप्पा वनमोरे (49), आक्काताई वनमोरे (72), रेखा माणिक वनमोरे (45), प्रतिभा वनमोरे (21),आदित्य वनमोरे (15), शिक्षक पोपट येल्लाप्पा वनमोरे (52), अर्चना वनमोरे (30), संगीता वनमोरे (48), शुभम वनमोरे (28) या एकाच कुटुंबातील 9 जणांचे 20 जून 2022 रोजी मृतदेह घरात आढळून आले होते.
म्हैसाळमधील 9 जणांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. या घटनेचा तपास करणाऱ्या सांगली पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासात सावकाराच्या जाचाला कंटाळून त्या 9 जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातूून समोर आले होते. या प्रकरणी सांगली पोलिसांकडून 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच 13 जणांना अटकही करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली नसून त्या सर्वांची गुप्तधनाच्या लालसेतून जेवणात विष घालून हत्या करण्यात आल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात अब्बास महमंदअली बागवान (वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर) या दोघा भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.