(संगमेश्वर)
सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर जाणारी शिडी धोकादायक झाल्याचे वृत्त आमदार शेखर निकम यांना समजताच त्यांनी येथे नवीन शिडी बसविण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर केला होता. याचवेळी गडावर असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. शृंगारपूर येथील जिगरबाज विनोद म्हस्के यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे काम मोठ्या मेहनतीने पूर्णत्वास नेले असल्याने आमदार शेखर निकम यांच्यासह विनोद म्हस्के यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
प्रचितगडावर असणाऱ्या भवानी मातेच्या छोट्याशा मंदिरावर यापूर्वी अनेकदा पत्रा टाकण्यात आला होता . मात्र गडाच्या बाजूने खोल दरी असल्याने येथे असणाऱ्या प्रचंड वाऱ्यामुळे मंदिरावरील पत्रे उडून जायचे. गडावर असणाऱ्या भवानी मातेसह अन्य मूर्ती छप्पर नसल्याने उघड्यावर होत्या. गतवर्षी विनोद म्हस्के गडावरील शिडीचे काम करत असताना आमदार शेखर निकम यांनी आपले चिरंजीव अनिरुध्द निकम यांना पहाणी करण्यासाठी पाठविले होते. गडावरील भवानी मातेच्या मंदिराची दुरवस्था पाहून अनिरुध्द निकम यांनी आमदार शेखर निकम यांना थेट गडावरुन फोन लावून मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.
शृंगारपूर येथील विनोद म्हस्के आणि अन्य ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना भवानी मातेच्या मंदिरासाठी निधी मंजूर करण्याची विनंती केली. प्रचितगड विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार निकम यांनी पर्यटनस्थळ विकास निधीतून भवानी माता मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करुन दिला. शिडीची उभारणी करणाऱ्या जिगरबाज विनोद म्हस्के यांनी मंदिर जीर्णोद्धाराची सर्व तयारी केली . शिडीचे काम करताना जनरेटर दूर अंतरावर ठेवावा लागल्याने वेल्डिंगच्या कामाला ताकद कमी पडत होती. विनोद म्हस्के यांनी ९० किलो वजनाचा छोटा जनरेटर विकत घेतला. तीस माणसांनी अथक मेहनतीने गडावर जाणाऱ्या नागमोडी आणि धोकादायक वाटेवरुन जनरेटर उचलून नेला.
शृंगारपूरचे विनोद म्हस्के, मनोज म्हस्के, महेश पवार तिवरे गावचे दीपक गुरव प्रकाश गुरव यांनी जीर्णोद्धाराचे संपूर्ण नियोजन केले. सर्व कामगारांची भोजनाची व्यवस्था केली. पातरपूंज येथील वेल्डर प्रकाश चाळके आणि मळे गावातील ३० मदतनीस अशा सर्वांनी मिळून भवानीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले. सलग सहा दिवस घेतलेल्या अथक मेहनतीतून मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आणि सर्वांनी भवानीमातेसह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करणाऱ्या विनोद म्हस्के यांना काम पूर्ण झाल्यानंतर अश्रृ अनावर झाले.
प्रचितगडावर काम करण्यासाठी जायचे , तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा हा भाग असल्याने वन विभागाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी डी एफ ओ गणेश पाटोळे यांनी एका दिवसात दिली . ए सी एफ तुषार ढमढेरे , आर एफ ओ संदीप जोपले, वनपाल, भरत खुटाळे या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, उप अभियंता गायकवाड, कनिष्ठ अभियंता इंदुलकर यांचेही उत्तम सहकार्य लाभल्याचे विनोद म्हस्के यांनी सांगितले.
भवानीमातेच्या आशीर्वादाने काम पूर्णत्वास
सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावरील भवानीमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार असो अथवा धोकादायक शिडीचे काम असो हे सारे पूर्णत्वास जाण्यासाठी साक्षात भवानीमातेचा आशीर्वाद असल्याचे विनोद म्हस्के यांनी नमूद केले. धोकादायक शिडीचे वृत्त वाचून निधी मंजूर करणारे आमदार शेखर निकम आणि गडावरील मंदिरासाठी निधी द्या म्हणून विनंती करणारे अनिरुध्द निकम यांनी या कामासाठी जी तत्परता दाखवली त्यासाठी विनोद म्हस्के यांनी शृंगारपूरवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. पर्यटन विभागास, बांधकाम विभागाचे अधिकारी, पातरपूंज येथील वेल्डर प्रकाश चाळके आणि मळे गावातील ३० कामगार यांच्या उत्तम सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे विनोद म्हस्के यांनी अभिमानाने सांगितले.