( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे असणारे सह्याद्री कला महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक अग्रणी कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते . येथून गेल्या ३२ वर्षात अनेक विद्यार्थी कलाशिक्षण घेऊन बाहेर पडले . यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी कलेच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला असताना येथे शिक्षण घेतलेले काही कलाकार गेले तीन महिने मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मोकळ्या भिंतींवर विविध चित्रे रेखाटून शहराचे सुशोभीकरण करण्याच्या कामात मग्न आहेत .
सलग तीन महिने हे कलाकार आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून विविध चित्राकृती रेखाटत अंधेरी पूर्व विभागातील भिंती बोलक्या करत आहेत . एकूण ५० हजार चौरस इंचाचे हे काम प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आले असून मार्च अखेरीस ते पूर्णत्वास जाणार आहे . दिवसरात्र मेहनत घेत या कलाकारांनी हे काम आता अखेरच्या टप्प्या पर्यंत आणले आहे . काही ठिकाणी भिंतीची उंची २५ फुटांपर्यंत असल्याने बांबूच्या पराती बांधून कलाकारांना काम करावे लागले आहे . पाण्यात विरघळणाऱ्या डिस्टेंपर रंगांमध्ये या भिंती रंगविल्या जात आहेत . भिंतींवरील चित्रे ही अमूर्त आकारासह मॉडर्न आर्ट प्रकारातील क्रिएटिव्ह स्वरुपाची आहेत .
अविस्मरणीय अनुभव !
बांबूच्या पराती बांधून उंच भिंतींवर चित्रे रेखाटण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता . चित्रे रेखाटताना आम्ही आमच्या कामात एवढे तल्लीन होवून जायचो की , आपण २५ फुटांच्या उंचीवर आहोत हे विसरुन जायला व्हायचे . चित्रे रेखाटताना उन्हाचा त्रास होत होता . मात्र हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर आणि रात्री उशीरापर्यंत काम करत होतो . भिंतींचे सुशोभन करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता . यासाठी आम्हाला ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के सर आणि सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सर , प्राध्यापक अवधूत खातू यांचे मार्गदर्शन लाभले .
अमेय कोलते : कलाकार
या कलाकारांचा आम्हाला अभिमान !
सह्याद्री कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी बेरोजगार रहात नाही , हे आम्ही अभिमानाने सांगतो . येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड पाहून त्याला त्याच्या स्वतंत्र शैलीत काम करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते . आमच्या कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले कलाकार आपल्या कलाविष्कारातून मुंबई शहराचे सुशोभन करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे .
प्रकाश राजेशिर्के : ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार