(नवी मुंबई )
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि अंमली पदार्थांचे जाळे शहरात पसरू पाहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. येथील सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल 19.05 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी 7 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई परिसराला टार्गेट करत तेथे अंमली पदार्थांचे जाळे गेल्या काही वर्षांपासून पसरवले जात होते, यामध्ये मुख्यत्वे नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
ड्रग्जच्या जाळ्यातून नवी मुंबईला वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला. सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत 75 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील 7 जणांकडे ड्रग्ज सापडले आहेत. यामध्ये 898 ग्रॅम कोकेन, 300 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ट्रायमॉल हायड्रोक्लोराईडच्या 36 हजार 640 ट्रप्स असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.