(चिपळूण)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी आयोजित शिर्डी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित, ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया आणि सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ प्रकाश कांकरिया या दाम्पत्याच्या हस्ते पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण महिला सखी मंचच्या प्रियंवदा भिकाजी तांबोटकर, कांचन गौतम सावंत, चंद्रकला गोरखनाथ शिंदे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सुभाष वाखारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाटेकर यांना यापूर्वी भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांनी विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण याकरिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान पर्यंत प्रवास केला आहे. पर्यटन, पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण, ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी या ३ चरित्र पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या पुस्तकाचे संपादन, सुमारे २५ हून अधिक विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आणि पुस्तिकांचे संपादन त्यांनी केले आहे. संदर्भीय कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, ‘परमचिंतन’ अभ्यासिका आणि वस्तूसंग्रहालय आदी छंद जोपासून आहेत.