(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे सहाय्यक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी एकाची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. ही घटना पाली येथील महावितरण कार्यालयात ४ जुलै २०१९ रोजी घडली होती.
सविस्तर वृत्त असे की, ४ जुलै २०१९ रोजी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आणि इलेक्ट्रीक पोल व लाईनवर झाडे कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला होता. पाली सेक्शनमधील करंजारी फिडरची मेनलाईनही तुटली होती. पाली मठाच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. ११ के.व्ही. लाईन बंद पडल्यामुळे १० गावांचा विद्युतपुरवठा बंद झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक अभियंता धनाजी कृष्णराव कळेकर (३६) हे पाली येथील आपल्या कार्यालयात बसले असताना त्यांच्या मोबाईलवरती फोन आला व दळी नामक तरुणाने कळेकर यांना लाईट कधी येणार अशी विचारणा करत ‘तू तिथे काय काम करतोयस?’ अशी विचारणा केली.
यावेळी करंजारी लाईन सुरू झाल्यानंतर तुमची लाईन आम्ही सुरू करून देतो, असे कळेकर यांनी सांगितले. मात्र संतप्त झालेल्या सिद्धेश दळीने कार्यालयात येऊन अधिकार्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. नाणिज येथील लाईट कधी येणार? अशी विचारणा करून तुम्ही आत्ताच्या आत्ता माझी लाईट सुरू करून द्या, अशी भूमिका सिद्धेश याने घेतली. सहाय्यक अधिक्षक धनाजी कळेकर व इतर अधिकारी त्याची समजूत काढत असताना सिद्धेश याने कळेकर यांचे शर्ट पकडून त्यांना मारहाण केली. ‘तू एकटा मला सापड, तुला तुडवतो’ अशी धमकीही दिली होती.
याप्रकरणी धनाजी कळेकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी दळी याच्यावर भादंविक ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने सिद्धेश दळी याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
दळी याच्यावतीने ऍड. मुन्ना शिंदे, ऍड. राहुल चाचे, ऍड. गिरीश भिडे, ऍड. प्रविण कदम यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून दळी याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तत्ता केली.