(चिपळूण)
मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी आपल्या कुटुंबांसह पर्यटनासाठी मालवणकडे जात असताना ट्रॅव्हल्सला अपघात झाला आणि १६ जण जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यातील १५ जणांना घरी पाठवण्यात आले असून, एका महिलेवर उपचार सुरू आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे मच्छी बाजारासमोर शुक्रवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला. मुंबईतील खडपे ट्रॅव्हल्स ही बस रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघात प्रकरणी ट्रॅव्हल्सचा मालक व चालक विनीत विलास खडपे (रा. कांदिवली, पूर्व मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडपे ट्रॅव्हल्सची ही बस बोरीवलीहून मालवणकडे निघाली होती. मुंबईतील एका कंपनीतील कर्मचारी सुटीनिमित्त या ट्रॅव्हल्सने मालवण येथे फिरायला निघाले होते. सावर्डे येथे ही बस आली असता भटक्या कुत्र्यांचा घोळका अचानक समोर आला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला घेत असताना चालक विनीत खडपे याचा ताबा सुटला आणि बस दुभाजकावरून सर्व्हिस रोडवर उलटली. त्यावेळी मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेत आतील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका मागवून त्यांना तातडीने डेरवण रुग्णालयात नेले.
अपघातात नितीन विठोबा ठाकूर, स्नेहा नितीन ठाकूर, वेदांत नितीन ठाकूर, शंकर मारुती घुगे, योगेश दत्तात्रय परब, आकांक्षा अशोक सावंत, सुहासिनी दत्तात्रय परब, भक्ती धनंजय पडवळ, रोहित प्रकाश बच्चाव, पूजा राेहित बच्चाव, प्रिशा रोहित बच्चाव, अनुजा अशोक सावंत, अशोक दत्ताराम सावंत, तृप्ती पंकज पचारणे, पंकज विलास पचारणे, स्वामिनी सुखदेव सांगळे जखमी झाले आहेत. यातील सुहासिनी परब (६५) यांच्यावर अजून उपचार सुरू असून, उर्वरित प्रवाशांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी सावर्डे पोलिसांनी चालक विनीत खडपे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.