राज्यात अपघाताच सत्र सुरुच आहे. नाशिक आणि अहमदनगरला जोडणारा म्हैसवळण घाटात ४० विद्यार्थ्यांना नेणाऱ्या सहलीच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर परिसरातील नागरिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले. तसेच जखमी विद्यार्थ्यांना एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पूर्वकडील नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा म्हैसवळण घाटात विश्राम गडावरून टाकेद नाशिकच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या (MH 15 AK 1632) बसचा ब्रेक फेल झाला. या बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. बसचा ब्रेक फेल झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला बस घसरवली. यावेळी बस उलटी झाली आणि यामुळे ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर १० जण जखमी झाले.
स्थानिका ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील विद्यार्थांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांचेवर एस एम बी टी रुग्णालयातील कार्डेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या पोलिसांकडूनही पाहणी करण्यात आली असून क्रेनच्या मदतीने अपघाती बस बाजूला करण्यात आली.