(रत्नागिरी)
रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि गुहागर मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात आमदारकीच्या वेळेस निवडणूक लढवून कमी मतात पराभूत झालेले सहदेव बेटकर यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विश्वासावर राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत काल मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड, दापोली अशा तालुक्यातील पदाधिकारी यांचाही समर्थकांसहीत जाहीर प्रवेश झाला.
सहदेव बेटकर हे रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा चांगला संपर्क आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम आहे. गुहागर विधानसभेमध्ये भास्कर आमदार जाधव यांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी घेऊन विधानसभेची तयारी केली होती. गुहागरमध्ये त्यांना चांगले मतदान झाले होते. मात्र साडेतीन हजार मतांनी ते पराभूत झाले. यावेळीही मी गुहागरवासियांच्या संपर्कात असून मी माझी तयारी सुरू ठेवली आहे आणि यावेळेसही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समोर असणाऱ्या उमेदवाराला थूळ चारणार असल्याचे सहदेव बेटकर सांगायला विसरले नाहीत.
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्या पाठीशी असल्याचे सांगत हवी ती मदत आणि हवे ते काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर मी लवकरच गुहागरचा दौरा करणार असून गुहागर मधील प्रत्येक काम, प्रत्येक लोकांशी संपर्क आणि युवकांना रोजगार हे उद्देश घेऊन मी आता मैदानात उतरलो आहे. गुहागर मधील अनेक लोक माझ्या संपर्कात असून लवकरच गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मेळावा घेणार असून याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे तसेच या मेळाव्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहदेव बेटकर यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेकजण संभ्रमात होते. मात्र त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन काल प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सहदेव बेटकर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लवकरच सहदेव बेटकर यांच्यावर महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी देणार असल्याचे जाहीर केले आहे. नेमकी सहदेव बेटकर यांना कोणती जबाबदारी मिळणार आहे याकडे आता सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सहदेव बेटकर यांच्या समावेत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कृष्ण हरेकर, पप्पू सुर्वे, कमलाकर ब्रीद सहित हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला. ना.उदय सामंत यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश झाला असून प्रवेश करण्यासाठी अल्पसंख्यांकचे नेते रमजान गोलंदाज आणि जमूरत अलजी यांनी प्रयत्न केले.