(संगलट / वार्ताहर)
चिपळूण तालुक्यात मुंबई- गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात तरूणीचा मृतदेह मिळाल्याची बातमी आल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे? याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा मृतदेह परशुराम पायरवाडी येथील एका महिलेचा असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्या चंद्रकांत मेटकर (३४) या विवाहित महिलेचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. परशुराम घाटाजवळ असलेल्या सवतसडा धबधबा या ठिकाणी असलेल्या दगडाच्या रांजणात या महिलेचा मृतदेह मिळाला मिळाला होता. अडकलेले स्थितीत हा मृतदेह मिळाल्याने या सगळ्या प्रकाराबद्दल अपघात की घातपात या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला या महिलेचे नाव कळत नसल्याने हा मृतदेह कोणाचा ही महिला कोण? हा सगळा प्रकार काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते होते.
चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे नाव आणि अन्य प्राथमिक माहिती मिळवली आहे. ही महिला नातेवाईकाकडे जाते असे सांगून घरातून निघाल्याची चर्चा परिसरात आहे. सोमवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात या सगळ्या घटनेची नोंद करण्यात आली. ही महिला परशुराम येथील पायरवाडीत राहणारी आहे. या महिलेचा पती हा मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे.
या महिलेला एक लहान मुलगा असून ती गावी आपले सासरे, दीर, जाऊ आणि दिराची दोन मुले या कुटुंबासमवेत राहत होती. मात्र ही महिला घरातून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची खबर चिपळूण पोलिसांना देण्यात आली होती का? ही महिला त्या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणासाठी गेली? किंवा तिने स्वतःहून काही जीवाचे बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला का? की त्या ठिकाणी गेल्यावर तिचा घसरून पाय पडून अडकल्याने मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या सगळ्या अनुषंगाने चिपळूण पोलीस आत तपास करत आहेत.