(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सेवाभावी वृत्ती जपताना आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना देखील काही घटकांकडे विशेष दुर्लक्ष होत असते याची जाण ठेवून एमबीबीएस फाउंडेशनचे कार्यकर्ते थेट सर्कसच्या तंबूत पोहोचल्याचे वृत्त हाती आले आहे. सामाजिक उपक्रमांपासून कायम दूर राहत असलेल्या सर्कस कलाकारांना यावेळी तंबाखू मुक्तीसह अन्य अमली पदार्थ सेवन न करण्याचे महत्त्व विविध पोस्टर्स, जम्बो सापशिडी खेळाच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. सलाम मुंबई आणि एमबीबीएस फाऊंडेशन्स तर्फे 29 मे ते 29 जून या कालावधीत विविध ठिकाणी तंबाखूजन्य व अन्य अमली पदार्थ सेवन विरोधी महिना राबविण्यात येत आहे.
जगभरात 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात आणखी जोमाने काम करण्याच्या दृष्टीने व्यसन विरोधी मासाचे 29 जून पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे एमबीबीएस फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक अॅड प्रशांत जाधव यांनी सांगितले. दरम्यान नवनवीन कार्यक्षेत्र निवडून जिल्हाभरात आपले कार्य वर्षभर सुरू राहणार आहे. मात्र सुपरस्टार सर्कसचे कसरती कलाकारांना भेटून आणि त्यांचे तंबाखू आणि इतर अमली पदार्थ विषयक प्रबोधनी हा आपल्या आयुष्यातील अनोखा प्रयोग वाटला, कामाचे समाधान मिळाले असे त्यांनी सांगितले. सुपरस्टार सर्कसचे मालक देखील तंबाखू विरोधी भूमिकेत असल्याने त्यांचे सहकार्य लाभले सर्कस मालक श्री विजय माने व त्यांचे सुपुत्र यांचा सेवाभावी उद्योजक पुरस्कार देऊन सलाम मुंबई फाउंडेशन व मायबाप बालसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्कस सारख्या कसरती व्यवसायास जिवंत ठेवल्याबद्दल त्यांना फाउंडेशन तर्फे धनादेश देखील प्रदान करण्यात आला. सर्कस मालक व त्यांचे सुपुत्र यांना सेवाभावी उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह अभिनंदन केले.
पुरस्कार प्राप्त पिता-पुत्रांनी देखील मायबाप बालसेवा फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच तंबाखू मुक्ती तसेच अन्य अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. यावेळी सर्व सर्कस कलाकारांसह मायबाप बालसेवा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक प्रशांत जाधव यांच्यासह फाऊंडेशनचे प्रमुख पदाधिकारी कविता जाधव, हरेश गावडे, करूणा कांबळी,अलोक जाधव आदी उपस्थित होते.