(क्रीडा)
आशिया चषकातील सुपर -४ फेरीत भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे, तर श्रीलंकेचा सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे श्रीलंकेने जवळपास फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले १७४ धावांचे आव्हान श्रीलंकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात एक चेंडू राखून पार केले. आशिया चषकातील सुपर ४ लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताचा अजून एक सामना शिल्लक आहे. या सामन्यात भारताने जर विजय साकारला तर अंतिम फेरीत पोहोचण्याची एक आशा असेल. त्यामुळे आता भारतीय संघ अफगाणिस्तानच्या या सामन्यात कशी कामगिरी करतो हे बघणे महत्त्वाचे आहे.
भारताने दिलेल्या १७४ धवांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. पाथुम निसांकाने ३७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागिदारी केली. श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांनी भारताविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी आहे.
आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे आशिया चषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने तीन सामन्यात १५५ धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले होते. तुफान फॉर्ममध्ये असणा-या विराट कोहलीला दिलशान मदुशंकाने त्रिफाळाचित बाद करत श्रीलंकेला मोठे यश मिळवून दिले.
दुखापतीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणा-या राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. राहुलला आतापर्यंत एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
Post Views: 2,108