(नागपूर)
जयप्रकाश नारायण यांनी १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात केलेल्या प्रयोगाचा संदर्भ देत ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, टीएमसी आणि इतर प्रमुख भाजपविरोधी पक्षांना मिळून ६५ टक्के मते मिळतात. असे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर मोदींचा पराभव होऊ शकतो.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मते मिळाली होती. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३७.७ टक्के मते मिळाली. अशा प्रकारे भाजपची ६ ते ६.५ टक्के मते वाढली होती. बालाकोट हल्ल्यामुळे भाजपच्या मतांमध्ये ही वाढ झाली, असे माझे वैयक्तिक मत आहे. आजही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपकडे साधारणपणे ३५ टक्के मते आहेत. पण २०१९ मध्ये देशातील सुमारे ६५ टक्के जनतेने नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी मतदान केले हेही तितकेच खरे आहे. काहींनी ममता बॅनर्जींना, काहींनी अखिलेश यादव यांना, काहींनी काँग्रेसला तर काहींनी दुस-या पक्षाला मतदान केले होते. सर्व विरोधी पक्ष भाजप विरोधात एका विचाराने एकत्रित आले तर २०२४ ची लोकसभा निवडणूक ३५ टक्के विरुद्ध ६५ टक्के व्होट बँक अशी लढत असेल.
आजही देशात काँग्रेसला १९ टक्के, भाजपला ३५ टक्के आणि यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ३ ते ४ टक्के मते मिळतात. असे असूनही नरेंद्र मोदींना पर्याय असू शकतो, असे अन्य कोणी पक्षाने म्हटले तर ते शक्य दिसत नाही. तर काँग्रेस हाच एकमेव पर्याय असू शकतो. चव्हाण यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता हा टोला लगावला.