( नवी दिल्ली )
वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला थोडासा का होईना पण दिलासा देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे. काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट केल्याची घोषणा केली. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा करत सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे. ही दरकपात तात्काळ लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.
घरगुती वापराच्या 12 सिलेंडरपर्यंत, 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा फायदा हा 9 कोटी उज्ज्वला गॅस योजना धारकांना होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.