(रत्नागिरी)
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केल्यास सर्व निवडणुकांमध्ये आपली बाजी असेल. आगाऊपणा करणाऱ्यांना थांबवण्याची ताकद प्रत्येकात हवी. मी जरी चुकलो तरी सांगायला पाहिजे. हेवेदावे बाजूला ठेऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मिशन ४८ हे ध्येय उराशी बाळगून काम केले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांच्या समन्वयाला सुरुवात झाली आहे, प्रत्येक जिल्ह्यात समन्वयासाठी १४ जानेवारीला संकल्प मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
आता महायुती म्हणून एका – गाडीतून फिरले पाहिजे. आजपासून माझा रत्नागिरीत किंवा जिल्ह्यात जो कार्यक्रम असले त्याला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण असेल, अशी स्पष्ट भूमिका मुख्य समन्वयक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची महत्त्वाची आणि पहिली बैठक हॉटेल विवेक मध्ये झाली. यावेळी भाजपचे समन्वयक प्रमोद जठार, शिवसेनेचे सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासह तिन्ही पक्षाच्या महिला संघटक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिन्ही पक्षाच्या समन्वयकांनी एकजूट ठेऊन ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. लवकरच महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संकल्प मेळावा संक्रातीदिवशी रत्नागिरीत होणार आहे. याला प्रमुख ३ हजार समन्वयक उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, पूजा निकम, आ. योगेश कदम, भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आ. प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरूण उर्फ अण्णा कदम, शंकर कांगणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, राष्ट्रवादीच्या दीक्षा दाभोळकर, अबू ठसाळे आदी उपस्थित होते.