(मुंबई)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले जात आहे, मात्र हे सरकार पडेल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. विस्तार होत नसल्यामुळेच विस्ताराच्या विमानाने ते फिरत आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. बोरिवलीत युवा सेनेने महायुथ फाऊंडेशनच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही टीका केली.
ते म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरत आहेत. आता गुवाहाटीला गेले होते, तिथून आणखी कुठे जाणार, असा सवाल करीत महाराष्ट्रासाठी काम करायचे त्यांच्या मनात कधीच नव्हते, असा आरोप त्यांनी केला.