राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्याच्या बाहेर जावु नये तो तालुक्यातच मार्गी लागावा आणि कोकणचा विकास व्हावा या भावनेने प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापूरात आयोजीत मेळाव्याला मोठा जनसमुदाय लोटला होता. “झालीच पाहिजे .. झालीच पाहिजे, रिफायनरी, झालीच पाहिजे” अशा गगनभेदी घोषणांनी सभागृह दणाणुन गेले होते. “सरकार तुम्ही तुम्ही दाद घ्या ना… रिफायनरी राजापूरला द्या ना” अशी भावनिक साद घालत राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथील पाटीलमळा यशोदिनसृष्टी हजारोंच्या संख्येने रिफायनरी समर्थक जमले होते.
घरोघरी आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापूरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयानी कंबर कसली आहे. राजापूर तालुक्यातील विविध ५७ सामाजिक संघटना, १३० ग्रामपंचायती , सर्व राजकिय पक्ष यानी एकत्र येत हा रिफायनरी प्रकल्प राजापूरातच व्हावा यासाठी या समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते . रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती, राजापूर – धोपेश्वरचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यानी रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याला काय सुविधा मिळणार आहेत याची माहीती उपस्थिताना प्रस्ताविकामध्ये करून दिली .
आज अनेक जण म्हणतात की कोकण हा माझा श्वास आहे पण ते मुंबईत राहतात आणि कोकणात येणाऱ्या व कोकणचा सर्वांगीण विकास करु शकणाऱ्या व मोठ्याप्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पाला विरोध करत आहेत . या रिफायनरी प्रकल्पातून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइड या वायुपासुन कार्बन सिट बनवल्या जातात. ही ग्रीन रिफायनरी आहे त्यामुळे यातून प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची सर्व मानके या प्रकल्पामध्ये पाळली जातात अशी माहीती रिफायनरीचे अभ्यासक आशिष किर यानी बोलताना दिली .
फिनोलेक्स कंपनीच्या वेळीही हे एनजीओ त्यावेळी आले होते मात्र आता ते कुठेही दिसत नाहीत. एनजीओंच्या माध्यमातून काही लोक समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत . त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आशिष किर यानी सांगितले. कोकणातला बॅकलॉक भरून काढायचा असेल तर परमेश्वराने आपल्याला रिफायनरी प्रकल्पासारखी सुवर्णसंधी दिली आहे. कोणतेही सरकार आले तरी हा कोकणाचा बॅकलॉक भरून काढू शकत नाही मात्र हा रिफायनरी प्रकल्प हा बॅकलॉक भरुन काढू शकतो असे प्रतिपादन भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांधीवडेकर यानी केले. देव देतो आणि घेता येत नाही किंवा घेवु दिले जात नाही यासारखे दुसरे दुर्दैव नाही, असे सांगत बांधिवडेकर यानी रिफायनरीसाठीचे समर्थन संपूर्ण राजापूर तालुक्यातच नाही तर संपूर्ण कोकणात पोहोचले पाहिजे असा आग्रह धरला. हा देशाच्या हिताचा प्रकल्प आहे व आम्ही देशप्रेमी आहोत त्यामुळे हा प्रकल्प येथे झालाच पाहिजे असेही त्यानी यावेळी सांगितले .
फोनमध्ये क्रांती होवून आज ॲन्ड्रॉइड मोबाईल आला मग रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत अशा जुन्या तंत्रज्ञानाचा विचार करुन गैरसमज का पसरवले जात आहेत. कोकणातली जनता भोळी भाबडी आहे त्यामुळे त्याना नारळावर हात ठेवून शपथा घ्यायला लावून त्यांचे नुकसान करण्याचे पाप केले जात असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले .
राजापूर शहराला २४ तास पाणी मिळेल. राजापूर हे कोकणातील सर्वात मोठे शहर बनवण्याची ताकद या रिफायनरी प्रकल्पात आहे. रिफायनरी प्रकल्प आला तर फिनोलेक्ससारखे १०० प्रकल्प उभे राहु शकतात. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या ट्रेनिंग सेंटरचा पुरेपूर फायदा घेवून भविष्यात येणाऱ्या रोजगाराच्या संधीचा फायदा घेवुया असे आवाहनही यावेळी बांधिवडेकर यानी केले आहे .
नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात सातत्याने विरोधाची भुमिका घेवुन स्थानिकांची माथी भडकविण्याचे काम केले जात होते. यापुर्वी गत शासनाने नाणार रिफायनरीची अधीसुचना रद्द केली होती. जरी नाणार मधुन हा प्रकल्प रद्द झाला असला तरी तो कोकणातुन आणि राज्यातुन बाहेर जावु देणार नाही.
तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागातुन नागरीक रिफायनरीच्या समर्थनार्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते. यामध्ये विधानपरिषद माजी आमदार हुस्नबानु खलिफे , भंडारी महासंघाचे अध्यक्ष निविनचंद्र बांदीवडेकर, माजी जि प अध्यक्ष राजाभाऊ लिमये, डॉ . छाया जोशी , भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. शृती ताम्हणकर, फार्डचे अध्यक्ष केशव भट, ॲड. विलास पाटणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, भाजपा राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, गोवळ सरपंच अभिजीत कांबळे, कॉंग्रेस महिला आघाडी प्रमुख अनामिका जाधव, माजी उपसभापती शिवसेना उन्नती वाघरे, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, जि प सदस्या लक्ष्मी शिवलकर, माजी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय ओगले, ॲड .यशवंत कावतकर, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, मनसे पुरुषोत्तम खांबल, मेडिकल असोसिएशन चे मजिद पन्हळेकर, राजा काजवे शिवसेना विभाग संघटक डॉ. सुनिल राणे उपस्थित होते.