(नाशिक)
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाया सुरू आहेत. जिल्हा उपनिबंधकास ३० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर एका महिला अधिकाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ही महिला हिवताप अधिकारी पदावर कार्यरत आहे. संदर्भ रुग्णालयातील हिवताप विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना या लाचखोर महिला अधिकाऱ्यास अटक करण्यात आली होती. या हिवताप अधिकाऱ्याची बँक लॉकरची तपासणी केली असता एसीबीला मोठे घबाड हाती लागले आहे.
वैशाली दगडू पाटील असे संशयित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या कारवाईमुळे नाशिक जिल्हा रुग्णालयानंतर महत्वाचे असलेले संदर्भ रुग्णालय चर्चेत आले आहे. एसीबीने पाटील यांच्या घराची व बँक लॉकरची झडती घेल्यानंतर ८१ तोळे सोन्याच्या दागिन्यांचे घबाड हाती लागल्याने पथकही चक्रावून गेले.
वैशाली पाटील या संदर्भ रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या अखत्यारित कार्यान्वित हिवताप विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी आहेत. त्यांनी तक्रारदार आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्यासाठी त्यांच्याकडे १० हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर संशयित आरोग्यसेवक संजय रामू राव, कैलास गंगाधर शिंदे यांच्या मदतीने या लाचेची रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकातील हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी शिताफीने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.