(रत्नागिरी)
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लोकांशी संवादही साधला. तसंच मागील सरकारवर टीकेचा बाणही सोडला. आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे, त्याचे दिवस बदलले पाहिजेत हा आहे. त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे. शासन जनतेच्या हितासाठी आहे, निर्णय घेणारं शासन असावं लागतं असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकांना कचेरीत चकरा माराव्या लागू नये, सरकारी काम सहा महिने थांब हे आम्हाला बदलायचंय. चकरा मारणं, खेटे मारणं हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे. आम्ही घरी न बसता लोकांच्या दारी शासन आणण्याचा प्रयत्न केला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. समाजात शासनाप्रती लोकांचं तयार झालेलं मत बदलायचं आहे. म्हणूनच मी आणि देवेंद्र फडणवीसांनी शासनाच्या योजना घरोघरी गेल्या पाहिजे हे ठरवलं आहे, असं शिंदे म्हणाले.
सरकारनं घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर अधिकारी हे महत्त्वाचा दुवा ठरतील. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. ती समान वेगानं धावली पाहिजे. ती समान वेगानं धावल्यास त्या शहराचा, जिल्ह्याचा, राज्याच्या विकास वेगानं होत असतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून अधिकारीही चांगले काम करतायत. पूर्वीप्रमाणे कोणतेही मध्ये स्पीड ब्रेकर नाही, त्यामुळे गाडी सुसाट जायला हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर बोलताना पुन्हा युतीचं सरकार येईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 2019 ला मोदींच्या लाटेत विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडणून येणार आणि पुन्हा युतीचं सरकार सत्तेत येणार, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे बसचा प्रवास वाढला. ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करु लागले आहेत.
त्याचबरोबर, आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. चकरा, खेटे घेणे हे शब्द काढून टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले. आमच्या सरकारने ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल, केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. फंड देत आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहे. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते त्याचा लाभ लोकांना मिळतो.
आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष्य आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्हाला नष्ट करायची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.