(मुंबई)
सरकारला घटनाबाहय, बेकायदेशीर म्हणणा-यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत.
निर्णयाचे स्वागत
एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आज सत्याचा विजय झाला. कायदेशीर बाबी आणि तांत्रिक बाबी देवेंद्रजींनी सांगितल्या आहेत. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन केले. अनेक लोक बेकायदेशीर म्हणत होते. त्यांना कोर्टाने चपराक दिली आहे. त्यांनाच कालबाहय केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
बहुमताचा आदर
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिला आहे. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. शिवसेना-भाजप सोबत लढले, आणि दुस-यांसोबत सरकार स्थापन केले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केला असल्याचे त्यांनी सांगितले.