(मुंबई)
जे. जे. रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. डॉ. लहाने यांच्या जागी आता नवीन अधिकार्याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याच्या आरोपानंतर डॉ. लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते. या प्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. आता सरकारने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे. राजीनामा मंजूर केल्याबद्दल तात्याराव लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सरकारचे आभार मानले आहेत.
राजीनामा मंजूर झाल्यावर तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी जून २०२१ मध्येच सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तीनंतर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचं काम मला दिलं होतं. पण, २२ मे ला आमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आमच्या तक्रारीची चौकशी योग्य रितीने जात नाही पाहिल्यावर, आम्ही अधिष्ठांना विनंती केली की, अधिकाऱ्याची बदली करावी. कारण, या अधिकाऱ्याची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी यांनी चौकशी केली होती. पण, तसं झालं नाही.”
“विद्यार्थ्यांचा आरोप होता की, शिकवलं जात नाही. तर तो १०० टक्के चुकीचा आहे. तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया शिकवल्या होत्या. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवणं चालू केलं होतं. पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग चालू होतं. पण, रुग्ण तपासणे याला ते कारकूनी काम समजत होते. या विद्यार्थ्यांना शिकता यावं यासाठी प्रत्येक शस्त्रक्रिया टीव्हीवर दाखवली जात होती,” अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली.
“३८ पिढ्यांना आम्ही शिकवलं आहे. आता पास होऊन आलेली मुलं आरोप करतात हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आजपर्यंत गरीब रुग्णांना आम्ही दृष्टी देत आलो आहोत. त्यांना अंध होताना आम्ही पाहू शकत नाही. जे सहाव्या महिन्यात मोतीबिंदू शिकवतात, त्यांना आणावं आणि शिकवावं. म्हणून आम्ही आमच्या जागा मोकळ्या केल्या. सरकारकडे आम्ही राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली होती. ती सरकारने मंजूर केली आहे,” असे तात्याराव लहाने यांनी सांगितलं.
“आम्हाला बाजू मांडू दिली नाही, त्यामुळे याच्यामागे निश्चित कोणतरी असेल, असं वाटतं,” अशी शंकाही तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली आहे.