(नवी दिल्ली)
देशवासीयांनी सलग २ वेळा स्थिर सरकार निवडले. सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले. सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादावर कारवाई करण्यापर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत प्रत्येक वाईट प्रयत्नांचा नायनाट करण्यात आला. कलम ३७० ते तिहेरी तलाकपर्यंत निर्णायक निर्णय घेणारे सरकार ही सरकारची ओळख बनली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी सरकारबद्दल गौरवोद्गार काढले.
अर्थमंत्र्यांच्या भाषणापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदा-या पार पाडण्यास सक्षम आहे. गरिबी नसावी, मध्यमवर्ग श्रीमंत असावा. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे व्हावे, असा भारत असावा, असेही त्या म्हणाल्या. खाणकाम असो किंवा संरक्षण दल, आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची भरती होत आहे. सरकारने मातृत्व रजा १२ आठवड्यांवरून २६ आठवड्यांपर्यंत वाढविली. आज भारतातील तरुण ख-या अर्थाने नवनिर्मितीची ताकद जगाला दाखवत आहेत. भारत पुन्हा एकदा ज्ञानाचे हायटेक हब बनत आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.