(मुंबई)
प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत कामगारांना घर देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली आहे. यामुळे कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरासाठी अडीच लाख रुपये मिळतात. यामध्ये कामगार विभागाकडून प्रत्येक घरासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कामगार मंत्र्यांनी केली आहे.
नोंदणी प्रक्रिया
पूर्वी कामगार नोंदणीसाठीची फी ही २५ रुपये होती. परंतु आता ही फी कमी करून केवळ १ रुपयांमध्ये कामगार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे याचा जास्तीत जास्त कामगारांना फायदा होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन
प्रशाकीयदृष्ट्या आणि कामगारांना सोयीचे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामगार भवन बांधण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुरेश खाडे यांनी दिली आहे. या इमारतीमध्ये जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालय अशी स्वतंत्र व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.
ई-श्रम नोंदणी काळाची गरज असून प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी पूर्ण करावी. कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवावी असेही त्यांनी सांगितले.