(बारामती)
जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेधार्थउपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या मोर्चा काढण्यात आला होता. या मार्चात राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर मोर्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवले गेले. या मोर्चात अजित पवारांना उद्देशून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्य पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. यावेळी, अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. “सरकारचा भरलाय घडा; अजित पवार बाहेर पडा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते भिगवण चौक असा सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भिगवण चौकात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा मराठा समाजाकडून दिला गेला. तसेच वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु, असा इशारा देण्यात आला. आरक्षण मिळत नसेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे,अशी आक्रमक मागणी करण्यात आली. बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता.
मराठा आंदोलनात हिंसाचार करणारे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. मराठा आंदोलनात हिंसाचार करणारे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक बैठक झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. यामुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेणारे भिडे नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणीही यावेळी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली.