(मुंबई)
राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात जवळपास दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा जीआर आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. तब्बल ९ वर्षानंतर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ होत आहे. सरकारकडून जीआर प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपये करण्यात आले असून. माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन ८ हजार रुपयांवरुन १८ हजार रुपये करण्यात आलं आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचे मानधन ९ हजार रुपयांवरुन २० हजार रूपये करण्यात आलं आहे. २२ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा जीआर मंगळवारी उशिरा राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला.
उच्च न्यायालयानेही शिक्षण सेवकांच्या अल्प मानधनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. विविध शिक्षक संघटना व शिक्षण सेवकांकडून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती. मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेसाठीही घेतला होता.