(पुणे)
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपुरहुन पुण्याला चालली होती. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आठ प्रवासी बचावल्याचं समोर आलं आहे.
बुलढाणात सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ मध्यरात्री 1.30 वाजता हा अपघात झाला. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी होते. त्यापैकी 8 प्रवासी सुखरुप असल्याचे कळत आहे.
दरम्यान, या अपघातात सर्व मृतदेहांची अवस्था ओळखण्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे समजते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची भरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.