(मुंबई)
राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला अतिजलद मागनि जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यातील जनतेशी समाज माध्यमातून संवाद साधताना दिली.
समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येत आहे. मुंबईतील प्रकल्पांना गती देण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईत ३३७ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल, लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकासकामांचा धडाका सुरू आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील विकासकामांना गती आली आहे. थांबलेलं चक्र पुन्हा वेगानं फिरू लागलं आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलाय. परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्राकडे सगळेच आशेनं आणि विश्वासानं पाहू लागले आहेत.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री