जलचक्रामध्ये समुद्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण मानव जात जलचक्रावर अवलंबून आहे, आणि त्याचा सर्वात मोठा घटक समुद्र आहे. पृथ्वीवरचे सर्वांत जास्त कार्बन शोषून घेण्याची क्षमता समुद्रात आहे. त्यात एकपेशीय शैवाल आले आणि त्यावर जगणारी मोठी अन्नसाखळी आली. समुद्र हा फक्त किनारपट्टीवरील लोकांसाठी नाही. तो जागतिक पातळीवर सेवा पुरवत आहे. जेवढी आस्था स्थानिकांनी हवी तेवढीच देशवारील जनतेला हवी. हा समुद्र उत्सव बघण्यासाठी जरूर या, कारण हे एक प्रकारचे शिक्षणच आहे ज्याची आज गरज आहे. याकरिता जानेवारीत आसमंत व सहकारी संस्थांच्या सहयोगाने समुद्र महोत्सव होणार आहे, अशी इकॉलॉजिकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नुलकर यांनी सांगितले.
सागर महोत्सवाची माहिती आज पुणे येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या वेळी आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन, आसमंतचे विश्वस्त नितीन करमरकर, विश्वस्त राजन पेंडसे आणि किर्लोस्कर वसुंधराचे वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. १३, १४ आणि २१, २२ या कालावधीत सागर महोत्सव रत्नागिरीत प्रथमच होत आहे.
गुरुदास नुलकर म्हणाले की, मुंबईत विवांत अनटेम्ड अर्थ ने “सागर माझा सखा” महोत्सव केला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आसमंत फाउंडेशन कित्येक वर्ष देवराई जपत आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, फिनोलेक्स, जे. के. फाईल्स यांचाही सहभाग आहे. पुण्याच्या किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी, मुंबईतील कोस्टल कॉंझर्वेशन, विवांत अनटेम्प्ड अर्थ या संस्थांचाही सक्रिय सहभाग आहे. २५ फिल्म, पुळणी, खडकाळ किनारा, खारफुटी जंगल येथे प्रदीप पाताडे, डॉ. विशाल भावे व सौ. भावे ही सफर घडवतील. बीएनएचएस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोदरेज मॅंग्रूव्ह फाउंडेशन या संस्थांमधील तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे होतील. भाट्ये येथे वाळूशिल्प केली जाणार आहेत. कला महाविद्यालयांतील विद्यार्थी वाळूशिल्पे साकारतील. तसेच समुद्र विषयक फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. असा प्रथमच कार्यक्रम होणार आहे. मुले व नागरिकांना मत्स्यालय पाहता येणार आहे.
याप्रसंगी आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले की, गेली १० वर्षे पर्यावरण संवर्धन, लहान मुलांचा विका, भारतीय शास्त्रीय संगीत या क्षेत्रात काम करतोय. डॉ. नुलकर यांच्या सुचवल्याप्रमाणे हा महोत्सव होणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये साडेसात एकरावर जैवविविधता उद्यान केले आहे. ७५० झाडे, ५५ प्रकारचे पक्षी, २२ प्रकारची फुलपाखरे येथे पाहायला मिळतात. डॉ. नुलकर व डॉ. अर्चना गोडबोले यांच्या व्याख्यानात्मक कार्यक्रमानंतर सागर महोत्सवाची नीव पेरली गेली. महोत्सवात रत्नागिरीकरांसह पुणे, मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळेल.
किर्लोस्कर वसुंधराचे वीरेंद्र चित्राव म्हणाले, पहिल्यांदाच सागर महोत्सव होतोय. जैवविविधता, समस्या, जनता हे प्रश्न पाहतेय, तरुण पिढी उत्तर शोधतेय, या सर्वांचं समुद्रदर्शन होणार आहे. बऱ्याच गोष्टी समोर येतील. जगभरातील समुद्राशी निगडीत प्रश्न, महत्त्वाचे विषय असलेल्या फिल्म दाखवल्या जाणार आहेत. समुद्रातील प्लास्टिक ही मोठी समस्या आहेत. समुद्रसंबंधी अभ्यास करून केलेली फिल्म, शाळांतून प्रबोधन केले जाते त्याबाबतच्या फिल्मस आहेत.