(मुंबई)
गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले असून अनंत चतुर्दशीपर्यंत अशाचप्रकारे समुद्रात मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. परंतु यंदा गणेशोत्सवादरम्यान समुद्र किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफीश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे समुद्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या भक्तांना मत्सदंश होण्याची भीती वर्तवली जात असून या गणेश विसर्जनादरम्यान भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. तसेच पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ (Sting Ray – Jellyfish) प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती संबंधित प्रशासनाला केली होती.
मत्स्यदंश आणि प्रथमोपचार
मस्त्यदंशाची घटना घडल्यास नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी.
– ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
– ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
-जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
– जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
– मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
– जखम झालेल्या जागी बर्फ लावावा