(गणपतीकडे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या असलेल्या गणपतीपुळे येथील अथांग पसरलेल्या विलोभनीय समुद्राचे आकर्षण लक्षात घेऊन येथे आलेल्या विविध ठिकाणच्या सर्वच पर्यटकांना समुद्रस्नानाचा आनंद घेतल्याशिवाय राहवतच नाही. याच आनंदाच्या भरात अनेक पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन समुद्र स्नान करण्याचा अतिउत्साहीपणा व मोठा अतिरेक करतात. त्यातूनच आजवर अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र यांतील बहुतांशी पर्यटकांना समुद्रात बुडताना मरणाच्या दारातून वाचिवताना खऱ्या अर्थाने जीवदान देण्याचे काम येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या स्थानिक जीवरक्षकांबरोबरच समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट अँड बीच असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक घटनेप्रसंगी केले जात आहे.
यावेळी मोरया वॉटर स्पोर्टच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांकडून क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातील स्पीड बोट किंवा एखादी जेसकी बोट घेऊन तात्काळ त्या बुडणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याबाहेर बाहेर काढून प्राथमिक उपचार करण्याचे काम सामाजिक व माणुसकीच्या भावनेतून केले जाते. त्या बुडणाऱ्या पर्यटकाला जगण्याची नवी उमेद दिली जाते. मोरया वॉटर स्पोर्टच्या याच धाडसी कामगिरीमुळे गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या अनेकांचे प्राण वाचले आहेत. तसेच वॉटर स्पोर्ट येथील समुद्र किनार्यावर सुरू असल्यामुळेच सध्या अलिकडच्या काळात बुडून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे. म्हणुनच मोरया वॉटर स्पोर्टच्या याच कौतुकास्पद माणुसकीच्या कार्याला सलाम देण्यासाठी रत्नागिरी येथील मेरिटाईम बोर्डाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान भारताच्या ७३ व्या राष्ट्रीय प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून बुधवारी रत्नागिरी येथे करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड चे कॅप्टन संजय उमलमुगले यांच्या हस्ते मोरया वॉटर स्पोर्टच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मोरया वॉटर स्पोर्ट अँड बीच असोसिएशन गणपतीपुळेचे अध्यक्ष उदय पाटील, संजय मयेकर, प्रकाश डोरलेकर, दिनेश सुर्वे, प्रीतम मयेकर आदींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी वरवडे येथील बंदर विभागाच्या सहाय्यक बंदर अधिकारी सीमा चवंडे, रत्नागिरी कार्यालयाचे धोत्रे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आजतागायत गणपतीपुळे येथे समुद्रात अनेक बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचविण्यात आपले सर्वस्वी योगदान देत असल्याबद्दल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक करून सन्मान करण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल गणपतीपुळे येथील मोरया वॉटरस्पोर्टसच्या उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच यापुढे देखील केवळ व्यवसायाकडेच न बघता सामाजिक जाणिवेतून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत राहून अनेक विधायक उपक्रम राबविण्यासाठी ही मोरया वॉटर स्पोर्ट अँड बीच असोसिएशन गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर कार्यरत राहील, असा मनोदय उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आहे.