(जाकादेवी/ संतोष पवार)
तमाम बहुजन समाजात जनजागृती करून परिवर्तनाचा नारा बुलंद करणारे, बहुजनांच्या हक्कांसाठी अहोरात्र झटणारे, बहुजन समाज पार्टीचे महाप्रदेश सचिव तसेच कोकण- मुंबई झोनचे प्रभारी राजेंद्र आयरे यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. स्वामी समर्थ कार्यालय साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे जिल्हा बहुजन समाज पार्टी व मित्र मंडळाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
राजेंद्र आयरे हे एम.ए.एम.फील (पॉलिटिक्स) अशी त्यांची उच्चतम शैक्षणिक पात्रता असून त्यावेळी त्यांना मिळालेली उच्च दर्जाची नोकरी सोडून राजेंद्र आयरे समाज परिवर्तनाच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे काम करण्यासाठी ते समरस झाले. महाविद्यालयीन दशेत बहुजन समाज पार्टीच्या कार्याने प्रभावी झालेले राजेंद्र आयरे यांनी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी, बहेन मायावतीजी यांच्या कुशल नेतृत्वावर कार्यावर निष्ठा ठेवून बुद्ध-फुले-शिवराय-शाहू -आंबेडकरी विचारधारा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणाऱ्या बहुजन समाज पार्टीमध्ये सामिल झाले ते महाविद्यालयीन जीवनात, ऐन उमेदीत.
बहुजन समाज परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले टाकत पक्षीय राजकारणाची जबाबदारी समर्थपणे अंगावर घेतली. विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर संपूर्ण देशात बहुजन सामाजिक चळवळीमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती.
अशावेळी एका विज्ञानवादी विचारांचा बहुजन नायक कांशीरामजींच्या नेतृत्वाचा उदय झालेला श्री.आयरे यांनी वाचनातून अनुभवला नि पाहिला. बहुजन पार्टीच्या नेतृत्वाने बुद्ध -शिवराय-फुले -शाहू आंबेडकरी, पेरियार या चळवळीच्या संघर्षमय प्रवासामुळे समाजात लाभार्थी घटक तयार झाला. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय पटलावरील स्वाभिमानी नेतृत्व तयार झाले आणि या तालमीत तयार झालेल्या लढाऊ वृत्तीचे राजेंद्र आयरे यांनी सर्व स्तरात विचार रूजविला.खेडोपाडी जनजागृतीचा नारा बुलंद केला. बहुजनांची खरी-खुरी चळवळ प्रथम युवा शक्ती आणि तरूणांसह ज्येष्ठांमध्येही उतरवली.
रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या महाविद्यालयातील जीवनात कांशीरामजींच्या बामसेफ -दलित -शोषित संघर्ष समिती, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर आणि बहुजन समाज पार्टीच्या स्वाभिमानी न विकणाऱ्या चळवळीत तयार झालेले राजेंद्र आयरे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्वाभिमानी चळवळीची उर्जा जिल्ह्यात निर्माण केली.
चांगल्या नोकरीच्या मागे न लागता आपले जीवन बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करत आले आहेत. प्रचंड अभ्यास आणि रक्तात भिनलेलल्या चळवळीमुळे राजेंद्र आयरे हे जिल्ह्यातील स्वाभिमानी, पक्षनिष्ठ, एकनिष्ठ नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. प्रस्थापितांना न डगमगता बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरी, रामासामी पेरियार, कांशीरामजी विचारधारेला गती देण्याचे काम त्यांनी केले. कांशीरामजींच्या समता-मूलक विचारांशी आपली नाळ जोडली ती आजतागायत.
राजेंद्र आयरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाज परिवर्तनासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आपले आणि आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मोलाचे योगदान दिले. अनेक मातब्बर पक्षांना ठक्कर देणारी बहुजन समाज पार्टी सक्षम बनविली. तरूण कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार केली. अनेक कॅडर कॅम्प घेऊन आरक्षणाचे लाभार्थ्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी यांचे ते सातत्याने प्रबोधन घडवून आणण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. बहुजनांच्या जीवनात विचारांची क्रांती घडवून आणण्यात राजेंद्र आयरे यशस्वी ठरले.
पूरग्रस्त, दरडग्रस्त लोकांच्या मदतीसाठी अथवा होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी ते घरोघरी जाऊन स्वतः मदत जमा करणारे, स्वतः पदरमोड करून उचित ध्येयापर्यंत पोहोचणारे राजेंद्र आयरे यांना बहुजन समाजाचे धडाडीचे आदर्श नेतृत्व मानले जाते. विद्यार्थी दशेपासून आजतागायत ते पक्षाच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहिले. महाराष्ट्रातील बहुजन समाज चळवळीला अभिप्रेत असलेले मार्गदर्शक बहुजन समाज पार्टीचे महासचिव,कोकणचे सुपुत्र राजेंद्र आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आणि मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.
राजेंद्र आयरे यांच्या आजपर्यंतच्या बहुजन समाज परिवर्तनाचा प्रवास, मानवतावादी दृष्टिकोन, प्रसंगी गरजूंसाठी मानवतावादी दृष्टिकोन अंगिकारून ध्येयापर्यंत पोहोचणारे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला मानाचा सलाम करण्यासाठी आणि हीरक महोत्सवी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची रीघ लागणार आहे.