रत्नागिरी : सभेला उशिरा येणे तसेच प्रश्नांना समर्पक असे उत्तर न देणे आदी कारणामुळे प्रभारी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी अडचणीत सापडले आहेत. समाजकल्याणच्या मासिक सभेत त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे. भर सभेतच प्रभारी पदाचा कार्यभार काढून घेतल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे. प्रभारी पदही व्यवस्थित सांभाळून न शकल्याने त्यांना मिळालेले पद गमावून बसण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद समाजकल्याणचा पदभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी चिकणेंकडे देण्यात आला आहे. या सभेला प्रभारी अधिकारी जिल्हा परिषदेत उशिरा आले. त्यांच्याकडून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
यावरुन सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभापती, सदस्यांचा हा अवमान असल्याचे सभागृहात मत मांडले. मार्च अखेर आणि पंचवार्षिक मुदत संपत आल्यामुळे सदस्य शेवटच्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर अधिकार्यांकडून वेळीच सह्या होत नसल्यामुळे कामे करता येत नाहीत अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. चिकणे यांनी सदस्यांकडेच लेखी माहीतीची मागणी केली होती. हा एकप्रकारे सदस्यांचा अवमान आहे असेही मत सदस्यांनी मांडले.
यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी. डी. यादव यांच्याकडे प्रभारींची तक्रार केली. सभा चालू असतानाच चिकणे यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडे पदभार देण्याच्या सुचनाही केल्या.