(मानसिक संतुलन – भाग ६)
बुद्धांनी म्हटले आहे, “जगात दुःख आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही”. असे असेल तर मी दु:खावरच प्रेम केले तर….? जी समस्या मला भेडसावते आहे तिच्याशीच मी भिडलो तर किंवा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तर. खरेच की, जर मी कशाची अपेक्षाच केली नाही तर मला दुःखी करेल असे काय आहे ह्या जगात? महाभारताच्या शेवटी म्हणजेच युद्ध संपल्यावर कृष्ण कुंतीकडे येऊन म्हणाला ” आत्या, आयुष्यभर तू खूप दुःख सोसलेस; मानहानी आणि शारीरिक पिडा यांनी जणू तुझे आयुष्य भरून गेले आहे. म्हणून मी तुला तुझ्या इच्छेप्रमाणे काहीही द्यायला आता तयार झालो आहे. तू काहीही माग मी देतो. त्यावेळी जराही वेळ न गमावता कुंती म्हणली “कृष्णा द्यायचे असेल तर मला दुःख दे, आणखी काही नको” कृष्णाला मोठे आश्चर्य वाटले. आयुष्यभर दुःखच दुःख भोगणारी आपली आत्या आणखी दुःख का मागते बरे? असे विचारल्यावर कुंती म्हणाली, “कृष्णा, ज्या ज्या वेळी मला दुःख आले त्या त्या वेळी मला तुझी आठवण झाली. तू सदैव माझ्या जवळ रहावास. म्हणून मला सदैव दुःख दे.” कुंतीचे हे मागणे हे अद्भुत मानले जाते.
वैराग्य , हा योगशास्त्रातील एक असाच अद्भुत भाव आहे. वैराग्याने कोणत्याही समस्येचे मुळच उखडले जाते. सोडून देणे हा सरळ साधा अर्थ वैराग्याचा आहे. परंतु सोडणे इतके सोपे नाही. रात्री झोपेत शरीर सरळ असेल, कोणताही अवयव दुमडलेला नसेल तर बाह्य आणि आंतरिक सर्व अवयव शिथिल होतात व शरीर गाढ झोपेच्या आधीन होऊ लागते. त्याचवेळी आपल्याला दचकून जाग येते. शरीर एकदम सुटल्याने मन घाबरते. कारण सर्व बाबतीतले बंधन म्हणजे आपले जीवन होय. सर्व सोडण्याचा अर्थ मुक्ती आहे. बाह्य कित्येक घटकांचा मिलाफ म्हणजे आपले अस्तित्व होय. सर्व सोडून या मिलाफास तुम्ही आव्हान देता तेव्हा भीती ही वाटणारच.
अशाप्रकारे आपण सर्व बाह्य घटकांनी स्वतःस जणू गच्च बांधून घेतलेले आहे. ही बंधने पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयांची, देहाची, व नात्यागोत्यांतील आसक्तीची असतात. अर्थात ही बंधने आपल्याला क्षणिक सुखवणारी असली तरी ती आपल्याला कायम सुख देणारी नसतात. त्यातून क्षणभर सुख मिळाल्यासारखे वाटते खरे; परंतु हा भ्रमाचा भोपळा वेळोवेळी फुटल्याचे आपल्या ध्यानात येते. तरीही त्याचे खापर बाह्य घटकांवरच फोडून आपण मोकळे होतो. बाह्य घटक बदलणारे आहेत, हे माहीत असूनही त्यांच्याकडून आपण कायम सुखाची अपेक्षा करीत राहतो. एखाद्याने आपल्याशी चांगले वागावे असे आपणास वाटते. तो तसे न वागल्यास, ” माणुसकी राहिली नाही” असे म्हणून मोकळे होतो. प्रेमविरांचा प्रेमभंग होतो. ते निराश होतात. वास्तविक बाह्य घटकांकडून मग तो सजीव असो अथवा निर्जीव अशा पद्धतीची अपेक्षा करणे चूक आहे. वाया गेलेल्या मुलाकडून, वेडी माया असलेली माऊली कितीतरी वेळा निराश होत असते. तरीही तो आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणून आस लावून बसलेली असते. अशाने तिचे दुःख कधीच नाहीसे होणारे नसते.
मंडणगड तालुक्यात तळेघर नावाचे लहानसे गाव आहे. त्याठिकाणी आनंद विहार आश्रमाचा वृद्धांसाठी एक योग प्रकल्प कार्यरत आहे. वानप्रस्थाश्रम हे त्याचे नाव! यामध्ये गावातील वृद्धांना वैराग्याचे शिक्षण दिले जाते. ह्या प्रकल्पात नियमित येणाऱ्या एका आजीचा मुलगा खूप दारुड्या आहे. आजी आणि तिचा तो मुलगा दोघेच राहतात. त्या मुलाची बायको व मुले मुंबईला असतात. दारूच्या आहारी गेल्याने त्याचे कुटुंब (म्हणजे बायको आणि मुले) त्याच्या सोबत रहात नाहीत. तो निव्वळ पित नाही तर घरी हंगामाही करतो. आदला आपट करतो. आईवरही हात उचलतो. असे रोज करतो. घर जणू नरक बनले आहे. काही काळ त्याच्या आईने हे सहन केले. निराशही झाली. वानप्रस्थाश्रमात नियमित येऊ लागल्यावर तिला जीवनाविषयी काही गोष्टी समजल्या. आणि तिने निर्णय घेतला, की आता आपण दुःखी व्हायचे नाही. आपण मजेने जगायचे. आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचे. तिने यावर अधिक विचार केला. त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला. कोणत्या वारी व कोणत्या वेळी तो अधिक पितो, त्याला काय बोलले की तो अधिक चिडतो, कोणत्या प्रसंगी तो अधिक उत्तेजीत होऊन तोडफोड करतो. जर तो अशा पद्धतीने उत्तेजीत झालाच तर काय करावे, कुठे पळून जावे की लपून बसावे. त्यास जेवण द्यावे की देऊ नये इत्यादी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एवढ्या बिकट परिस्थितीही ती आता अगदी आनंदी आहे. परिस्थिला तिने पूर्णपणे स्वीकारले आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या स्वीकारायच्या असतात हे तिला पक्के पटले. आणि तिने आपली जीवन पद्धत बदलली. म्हटले तर समस्या, नाहीतर आनंदच आनंद!
वैराग्याचा दुसरा अर्थ आहे तटस्थता. जे समोर दिसते आहे त्या बाबतीत आपले कर्तव्य काय येवढाच विचार करावा. व ते कर्तव्य आनंदाने करून मोकळे व्हावे. त्या कर्माचा जराही ठसा स्वतःच्या मनावर उमटू न देता पुढच्या कामाकडे वळावे. यासच मानसिक संतुलन म्हणावे. इथे प्रश्न असा निर्माण होईल की मग मनुष्याला मिळालेल्या भावनेचा उपयोग काय? भावनेचा उपयोग जरूर करावा. परंतु त्या भावनांना सुख, शांती, आनंद मिळवून देणाऱ्या घटकांकडेच वळवावे. अन्यथा ह्या भावनाच आपल्याला दुःखात अधिक लोटतात. बऱ्याच वेळा ज्या भावनांना आपण इतके महत्व देतो त्या भावनांचे मूळ स्वरूपच आपण समजून घेतलेले नसते. प्रेमात अखंड डुंबलेले प्रेमिक पुढे एकमेकांच्या जीवावर उठत असतील तर ती प्रेमाची भावना फसवी म्हणावी लागेल. ते प्रेम नव्हतेच मुळी. ती होती केवळ आसक्ती. आणि आसक्तीच्या मागे लपलेला अहंकार! योगशास्त्र अशा भावनांना थारा देत नाही.
मन जेव्हा निराश होते तेव्हा जगावेसे वाटत नाही, सगळे जग कसे उदास उदास वाटते. असे कोणते प्रसंग जीवनात निराशा आणतात बरे?
• ज्यावर मी प्रेम केले ती व्यक्ती मला सोडून गेली.
• ज्यावर मी विश्वास टाकला त्याने माझा विश्वासघात केला.
• ज्याचे मी स्वप्न पाहिले ते स्वप्नच उध्वस्त झाले.
• जे मी समजलो ते खरे नव्हते. ते काहीतरी वेगळेच निघाले.
• ज्यांच्याकडून मी भौतिक किंवा मानसिक आधाराची अपेक्षा केली त्यांनी मला धोका दिला.
• ज्या मी अपेक्षा केल्या त्यातील एकही पूर्ण झाली नाही.
• ज्या देहावर विश्वास ठेऊन मी स्वप्ने पहिली ते शरीरच रोगी निघाले व मृत्यू पंथाला लागले.
यासारखी विविध कारणे घेऊन मी उदास होतो. त्यांची तीव्रता मी स्वतःच कमी जास्त करण्यासाठी वेळ देतो. अगदीच सर्व हाताबाहेर गेले आहे असे समजून मी स्वतःला निराशेच्या खाईत लोटत नेतो व स्वतःस संपवतो. आता यात जीवन उन्नत करणाऱ्या वैराग्याची कमतरता कुठे होती ती पहा…
• प्रेम ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला नाही. विनोबा भावे किंवा साने गुरुजी प्रेमाचा अर्थ ” त्याग ” असे सांगतात. हा शब्द हृदयाशी संबंधित आहे. त्यामुळे हृदयातील ही प्रेम भावना इतरांना देण्याने व समर्पित करण्याने वाढत जाते. हे प्रेमविरांना कळत नाही. दुसऱ्याने आपल्यावर प्रेम करावे ही याचक वृत्ती झाली. याचक वृत्ती आपल्याला परावलंबी बनवते. सतत चिंतेत टाकते. शंका निर्माण करते. व पुढे ही शंकाच संशयाला जन्म देते. भक्त ईश्र्वरावर प्रेम करतो तो काही अपेक्षेने करीत नाही. ईश्वरावर प्रेम करण्यात त्यास अति आनंद मिळतो. कारण त्यात अपेक्षा नसते. साधे उदाहरण बघा. गुलाबाचे फुल मला खूप आवडते म्हणून फुलाला मी आवडावे अशी अपेक्षा मी करीत नाही. प्रेम हे एकतर्फीच निख्खळ असावे. हे प्रेम इतर बाह्य घटकापुरते मर्यादित न राहता त्याने माझ्या सर्वांगाला व्यापून टाकावे. मीच प्रेममय होऊन जातो. खऱ्या प्रेमासाठी दोन घटक लागतच नाहीत. सुरवातीला कृष्णावर प्रेम करणारी राधा पुढे कृष्णच तिच्यात प्रवेश करतो व ती कृष्णमय बनते. पुढे राधाकृष्ण हे एकच नाव शिल्लक उरते.
• विश्वास हा शब्द स्थिर बाबींशी निगडीत असावा. विश्वास करण्याजोगी एकच बाब असते. ती म्हणजे ईश्वर! कारण ती कोणती वस्तू नाही. ती आपल्याशी संबंधित आहे. म्हणजेच स्वत:शिवाय इतरांवर आपल्याला अपेक्षित विश्वास ठेवणे सर्वथा चुकीचे आहे. त्यासाठी इतरांजवळ व्यवहार करतांना अपेक्षेशीवाय विश्वास ठेवणे योग्य होईल. कारण प्रत्येक वस्तू अथवा व्यक्ती ही बदलू शकते. हे गृहीत धरुनच शांतपणे व्यवहार करावेत.
• स्वप्न आणि वास्तव हे नेहमीच भिन्न असते. स्वप्न पहावी पण ती दिवास्वप्ने नसावीत. स्वप्ने ही स्वार्थी नसावीत. त्यात इतरांचेही हित असावे. स्वप्नांसाठी केलेल्या प्रयत्नानंतर जे साध्य होते ते नम्रपणे स्वीकारण्याची वृत्ती ठेवावी. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःस बांधील करू नये. त्यामुळे जीवनातील लहान सहान आनंदास आपण मुकतो. ” छोड दे सारी दुनिया, किसिके लिये” हे हिंदी गाणे नीट ऐका. प्रेमाची व्यापकता त्यात सांगितली आहे.
• जीवन जगत असताना काहीही घडू शकते. कारण ही सृष्टी आपल्या मर्जीप्रमाणे चालत नाही. त्यामुळे घडणाऱ्या घटना स्विकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो.
• आपल्या संपर्कात आलेला किंवा आपल्याशी जोडलेला प्रत्येक सजीव निर्जीव घटक काही कारणास्तव आपल्याशी जुडला आहे. त्यामुळे त्यास गृहीत धरून आपल्या जीवनाची नौका हाकु नये. नाहीतर त्याच्या अचानक नाहीसे होण्याने आपण निराश होतो. दिशाहीन होतो.
• मुळात कुणाकडून कोणती अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आपल्याला जे हवे असे वाटते ते स्वतःच मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी कुणी आपल्याला मदत केल्यास त्याचे आभार मानावेत. पुनश्च: त्याकडून तशाच वागण्याची अपेक्षा करणे चूक ठरेल.
• आपला देहही नश्वर आहे. त्यावरही अधिक विसंबून राहून चालणार नाही. म्हणून आजचा दिवस माझा आहे. उद्या कदाचित मी या जगात नसेन असा विचार करून जगल्यास आनंदाने जगता येते.
वैराग्याचा अर्थ स्वीकारणे. आपल्याबाबतीत जे काही घडते आहे ते आनंदाने स्वीकारायला हवे. “ठेविले अनंते तैसेचि रहावे”. ही उक्ती जीवन जगण्यास खूप धीर देते. सोडण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही. मला कुणाचे प्रेम मिळाले नाही मग मीच इतरांना खूप प्रेम देईन. प्रेम घेण्यापेक्षा देण्यात मोठेपणा असतो आणि आनंदही!
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक, मंडणगड
मोबाईल 9420167413