(न्यूयॉर्क)
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अमेरिकेच्या ब्रँडीस विद्यापीठात झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चिरंतन वारसा`या विषयावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहून भाषण केले. समलिंगी जोडप्यांबाबत घेतलेला निर्णय हा अंतरात्माचा आवाज आहे. मी माझ्या मतावर ठाम असल्याचे परखड मत धनंजय चंद्रचूड यांनी या परिषदेत मांडले
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने 3 विरुद्ध 2 अशा मतविभागणीमुळे समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेता येणार नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयावरून धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, समलिंगी जोडप्यांना मुले दत्तक घेण्याचे अनुमती न देणे म्हणजे भेदभाव करण्यासारखे आहे. परंतु ते संसदेने ठरवायचे आहे. या निर्णयाला माझ्या तीन सहकाऱ्यांनी असहमती दाखवली. मात्र अंतरात्माचा आवाज ऐकून हा निर्णय घेतला.
धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, अमेरिकेत भेदभाव करणारे कायदे लागू केल्याने गुलामगिरीला चालना मिळाली. जिम क्रो कायद्याद्वारे स्थानिक लोकांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक समुदायांना दीर्घकाळ मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही. अशाप्रकारे कायद्याचा वापर शक्ती संरचना राखण्यासाठी आणि भेदभाव वाढवण्यासाठी केला गेला. याचा फटका उपेक्षित समाजाला दीर्घकाळ सहन करावा लागला. समाजात भेदभाव आणि अन्याय सामान्य मानले जाऊ लागले. काही समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावले. त्यामुळे हिंसाचार आणि बहिष्काराच्या घटना घडल्या. इतिहासात उपेक्षित समुदायांविरुद्ध झालेल्या चुका कायम ठेवण्यात कायदेशीर व्यवस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. उपेक्षित सामाजिक गटांना भेदभाव, पूर्वग्रह आणि असमानता सहन करावी लागली.