गुहागर : समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेद्वारे संयुक्त शाळा अनुदान जमा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडण्यास प्राथमिक शाळांच्या केंद्रप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यात केवळ हेदवी येथील दुर्गम भागात या बँकेची शाखा असल्याने अनेक शाळांच्या व्यवस्थापन समितीने खाती काढण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेची बँक खाती शाळांना शिक्षा ठरली आहेत.
🟧 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी बँक आँफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर या बँकेतच खाती उघडणे आवश्यक असल्याचे पत्र पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. ही खाती झीरो बँलेन्सने कार्यान्वीत नसल्याने सदरचे संयुक्त शाळा अनुदान वितरीत करता येत नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रानुसार, गुहागर शिक्षण विभागाने सर्व केंद्रप्रमुखांना पत्र पाठवून झीरो बँलेन्सने खाती काढण्यास सूचित केले आहे. बँकेची शाखा कार्यालयाजवळ नसल्यास लगतच्या तालुका किंवा व्यवहार करण्यासाठी सोयीचे होईल अशा ठिकाणी खाती उघडण्याची कार्यवाही करावी, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.
🟧 सन 2021-22 या आर्थिक वर्षातील संयुक्त शाळा अनुदान, समूहसाधन केंद्र अनुदान, मिटींग व सभा प्रवास भत्ता आदी सर्व अनुदान हे गटस्तरावर पीएफएमएस प्रणालीवर प्राप्त झालेले आहे. हे अनुदान 31 मार्च 2022 पर्यंत खर्च करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तत्पूर्वी खाती उघडणे अनिवार्य असल्याचे सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, बँक आँफ महाराष्ट्र या बँकेची शाखा गुहागर तालुक्यात केवळ हेदवी येथे आहे. यानंतर चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे आहे. त्यामुळे खाती काढण्यास काही शाळांना अडचणी येत असल्याने संबंधीत शाळा व्यवस्थापन कमिटींनी याला विरोध दर्शवून तसा ठराव केला आहे.