( संगमेश्वर / प्रतिनिधी )
बावनदीच्या ब्रिटिशकालीन पुलाचा कठडा तुटल्याची घटना 2 महिन्यांपूर्वीच समोर होती. त्यानंतर आता वांद्री येथील सप्तलिंगी पुलावरील रेलिंग मोठया प्रमाणात तुटलेले आहेत शिवाय रेलिंग लोंबकळतही आहेत. या ठिकाणी अपघात झाल्यास वाहन नदीत कोसळून जीवितहानी होवू शकते.
या सप्तलिंगी पुलाची 1979 साली बांधकाम करण्यात आले. पुलाची लांबी 64.50 मीटर आहे. या पुलाला एकूण 3 गाळे असून 21.50 मीटरचा एक गाळा आहे. मात्र या पुलाकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. सध्या या पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून कठडे तुटले आहेत. हे कठडे सध्या लोंबकळत आहेत. रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणार्या बाजूच्या पुलाचा कठडा तर जवळपास 10-15 फुटापर्यंत तुटलेला आहे. रेलिंग तुटून नदीत पडलेले आहे. या ठिकाणी एखाद्या वाहनाचा अपघात घडल्यास वाहन थेट नदीत कोसळून जीवितहानी होवू शकते. शिवाय इतर कठडयांचे रेलिंग तुटून त्यातून शिगा बाहेर आलेल्या दिसून येत आहेत.
पुलावर दिशा दर्शक असलेला सिग्नल तर सध्या बंद स्थितीत आहे. या सिग्नलला सध्या वेलींनी वेढलेले आहे. सिग्नल तर दिसतच नाही. सध्या हे सिग्नल म्हणजे शोभेचे बाहुले झाले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सा. बां. विभागाने वेळीच लक्ष घालून पुलावरील तुटलेले संरक्षक कठडे सुस्थितीत करावेत आणि पुलावरील सिग्नल यंत्रणा पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे.