मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर रविवारी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामलल्लाची आरती केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस व प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने १४ वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी त्यांनी तो शब्द मोडला.
काँग्रेसवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर लोकांच्या मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीपोटी ते हिंदुत्वाला विरोध करत असतात.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मला आनंद आहे की, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर निर्माणाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यात ज्या लोकांनी अडथळा आणला त्यांना घरी बसावे लागले आहे. या दौऱ्यात त्यांनी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली.
Post Views: 3,607