(छ. संभाजीनगर)
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची वज्रमुठ सभा रविवार संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांनी सभेला हजेरी लावली. या सभेच्या नियोजनाची धुरा स्थानिक आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली होती.
यावेळी सभेच्या दिशेनं येणारी वाहनं दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्याची माहिती समजताच अंबादास दानवे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली. सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून जास्त मस्ती करू नका. पोलिसांना मस्ती आली असेल तर जिरवून दाखवू, असा धमकीवजा इशारा अंबादास दानवे यांनी संभाजीनगर पोलिसांना दिला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. तसेच कार्यकर्त्यांना दुसऱ्या मार्गानं जाण्यास सांगितलं जात असल्याचा आरोप करत दानवे यांनी थेट पोलिसांनाच दम दिला. सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांना जुबली पार्कजवळ येऊ देण्याचं आपलं ठरलेलं आहे. सध्या बाबा पेट्रोल पंपाजवळ किमान ८०० वाहनं उभी आहेत. आजचा दिवस तुमचा आहे. पण लक्षात ठेवा उद्याचा दिवस आमचा असेल. सत्ताधाऱ्याच्या नादाला लागून जास्त मस्ती करू नका, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी पोलिसांना धमकी दिली आहे. पोलिसांना जास्त मस्ती आली असेल तर ती जिरवून दाखवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे.