रत्नागिरी- दरवर्षी श्रावण पौर्णिमेला सर्वत्र संस्कृत दिन साजरा होतो. त्या अनुषंगाने संस्कृत मासात अनेक ठिकाणी अनेकविध कार्यक्रम साजरे केले जातात. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातही हा दिवस दरवर्षी उत्साहाने साजरा होतो. नुकताच ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक , नागपूर येथील कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीमध्ये नव्याने सुरू झालेल्या उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्कृत साहित्यामधील नगररचना शास्त्रामधील विविध घटक आपल्या मार्गदर्शनातून उलगडले. तसेच संस्कृतमधील वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी आवर्जून करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्कृतविभागप्रमुख डॉ.कल्पना आठल्ये यांनी डॉ.दिनकर मराठे यांचा परिचय करून देण्याबरोबरच संस्कृत दिनामागची संकल्पना आणि गोगटे कॉलेजमधील संस्कृत दिनाची परम्परा याविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि संस्कृत विभाग आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमातील नियमित सहभागाबद्दल विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात संस्कृत विभागाच्या आणि अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये आर्या केळकर हिने नृत्य सादर केले. मृणाल बक्षी, मयुरेश जायदे आणि अंजु वाडिये यांनी गीत सादर केले. तर कनक भिडे, प्रीति टिकेकर आणि तेजश्री जोशी यांनी समूहगीताचे सादरीकरण केले. अमृता खेर, पूर्णिमा व्हटकर आणि श्रद्धा गुरव तसेच आरती आणि अर्वीक्षा पवार, प्रीति टिकेकर आणि तेजश्री जोशी व रोहिणी रंगावार आणि श्रद्धा रंगावार यांनी संस्कृत संवाद सादर केले. सोनल ढोले हिने संस्कृत विषयक तथ्ये आणि यश आम्बर्डेकर याने कालिदास या विषयावर भाषण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरणासाठी सायली मुळ्ये हिने हार्मोनियम आणि शिवम् करंबेळकर याने तबला या वाद्यांची साथ केली. पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर झाले.
महाविद्यालयात संस्कृत दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या पाठान्तर, कथाकथन, गीतगायन, संभाषण , प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांच्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची उद्घोषणा प्रा. जयन्त अभ्यंकर यांनी केली. पाठान्तर द्वितीय वर्षात अनुक्रमे तेजश्री जोशी, श्रावणी फडके, प्रीति टिकेकर यांनी प्रथम , द्वितीय , तृतीय तर यश आंबर्डेकर याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. पाठान्तर तृतीय वर्षात अनुक्रमे मयूरेश जायदे, अमृता खेर, आर्या केळकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर सोनल ढोले हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. पाठान्तर एम. ए. भाग २ या वर्षात अनुक्रमे ऐश्वर्या आचार्य, नारायणी शहाणे, स्नेहल हर्डीकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत अनुक्रमे ऐश्वर्या आचार्य, मयुरेश जायदे, तेजश्री जोशी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तर ऋतुजा वझे हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. समूह स्पर्धा प्रकारात प्रश्नमञ्जूषा स्पर्धेत अनुक्रमे मयूरेश जायदे आणि यश आम्बर्डेकर यांनी प्रथम सोनल ढोले व श्रावणी फडके यांनी द्वितीय तर आर्या केळकर आणि तेजश्री जोशी तसेचअमृता खेर आणि प्रीति टिकेकर यांनी विभागून तृतीय क्रमांक प्राप्त केला. कथाकथन स्पर्धेत अमृता खेर हिला तर संस्कृत संभाषण स्पर्धेत तेजश्री जोशी – प्रीति टिकेकर यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संस्कृतमधून उत्तम सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.प्रीति टिकेकर हिने केले. तर संस्कृत विभागातील प्रा. स्नेहा शिवलकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा, संस्कृतप्रेमी प्राध्यापक, संस्कृत शिक्षक, संस्कृत विभागाचे आजीमाजी विद्यार्थी उपस्थित होते.