नवी दिल्ली : जुन्या संसद इमारतीतील कामकाजाचा मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी शेवटचा दिवस होता. जुन्या ऐतिहासिक संसदेला अलविदा देऊन सर्व खासदारांनी अधिवेशनाचे विशेष सत्र नव्या संसद इमारतीत सुरू केले. यानंतरचे सर्व अधिवेशन हे नवीन संसदेतच होणार आहेत. नवीन संसदेत कामकाज सुरू झाल्यापासून संसद खूप चर्चेत आहे.
संसदेच्या कॅन्टीनमध्ये खूप स्वस्त जेवण मिळते आणि तेथील जेवणाच्या किमतींवरुन अनेकदा सोशल मीडियावर वाद होत असतो. अशातच आज सविस्तर जाणून घेऊया की नेमका संसदेत कोणता पदार्थ किती रुपयांना मिळतो? संसदेतील कॅन्टीनमध्ये काय खास मेन्यू असतो? संसदेच्या कॅन्टीनमधील रेट लिस्टमध्ये २०२१ ला बदल करण्यात आले होते. इंडिया टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने २०२१ मध्ये कॅन्टीन रेटमध्ये बदल केले आणि ब-याच पदार्थांच्या किमती वाढवल्या. आधी कॅन्टीनमध्ये चपाती २ रुपयांना मिळायची, पण आता तिची किंमत ३ रुपये करण्यात आली आहे. यानंतर चिकन, मटणाच्या डिशपण आता महागल्या आहेत, त्यांच्या किमती देखील आधीपेक्षा वाढविण्यात आल्या आहेत. संसदेत कोणते पदार्थ किती रुपयांना मिळतात याची लिस्ट खाली दिली आहे.
कशी आहे किंमत?
या कॅन्टीनमध्ये बटाटा वडा (आलू बोंडा) १० रुपये, चपाती ३ रुपये, दही १० रुपये, डोसा ३० रुपये, लेमन राईस ३० रुपये, मटण बिर्यानी १५० रुपये, मटण करी १२५ रुपये, ऑम्लेट २० रुपये, खीर ३० रुपये, उपमा २५ रुपये, सूप २५ रुपये, समोसा १० रुपये, कचोरी १५ रुपये, पनीर पकोडा ५० रुपयांना मिळतो.
संसदेच्या कॅन्टीनमध्ये व्हेज अनलिमिटेड जेवण 500 रुपयांना मिळतं, ज्यात सर्व प्रकारच्या भाज्या, भाताचे विविध प्रकार, बिर्यानी, डाळ, स्विट्स आणि शीतपेय मिळतात. तर अनलिमिटेड नॉन व्हेज जेवण हे 700 रुपयांना मिळतं, ज्यात चिकन आणि मटणाचे विविध प्रकार, स्टार्टर्स, सुकं चिकन, सुकं मटण, करी, भात, स्विट्स असे विविध पदार्थ मिळतात, जे तुम्ही हवे तेवढे मनसोक्त खाऊ शकता. या शिवाय 50 रुपयांना मिनी थाळी आणि 100 रुपयांना मोठी थाळी देखील मिळते, ज्यात 7 ते 8 पदार्थांचा समावेश असतो.