(रत्नागिरी /प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व बहुजन साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी रविवारी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून ‘संविधान साहित्य कला अकादमी’ या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
संविधान दिनी स्थापन करण्यात आलेल्या ‘संविधान साहित्य कला अकादमी’ या संस्थेच्या पोस्टरचे अनावरण प्रमोद कांबळे व अरुण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र कांबळे, उमेश मोहिते, प्रांजली कांबळे, तेजस कांबळे आदी उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून उत्तम साहित्यिक, कवी, कलाकार घडावेत यासाठी विचारमंच उपलब्ध करून देण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसांत संस्थेची कार्यप्रणाली, अंमलबजावणी याबाबत आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी संस्थेत काम करणाऱ्या साहित्य प्रेमी व कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील कांबळे यांनी केले आहे.