(नांदेड)
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले (आरएसएस) अधूनमधून संविधान बदलण्याची भाषा करतात. संविधान टिकले तरच आरक्षण टिकेल. त्यामुळे संविधानाचे रक्षण होणे गरजेचे आहे,” असे मत ॲड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नरसी (ता. नायगाव) येथे रविवारी ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा झाला. त्यात मार्गदर्शन करताना ॲड. आंबेडकर बोलत होते.
“ज्याचे त्याला स्वतंत्र आरक्षण असावे. ओबीसींना ‘ओबीसी’तून ते मिळावे. कदाचित न्यायालयाने मान्य केले तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण असावे,” असे ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले. राज्यासह देशात लुटारूंची व्यवस्था सुरू आहे. त्यांना आपलाच अजेंडा राबवायचा आहे. अधूनमधून ते संविधान बदलण्याची भाषा करतात, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. संविधान वाचले तरच आरक्षण वाचेल, संविधानच नसेल तर आरक्षण कुठे राहील, असा सवाल करून आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाल्यांनाच मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात भाजप विशिष्ट अजेंडा राबवत असून यामागे ओबीसींच्या हाती सत्तेच्या चाव्या जाऊ नयेत, अशी भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. “नांदेड जिल्ह्यात नऊपैकी सहा आमदार मराठ्यांचे आहेत. ७० टक्के ओबीसी असताना शंभर टक्के आमदार मराठे आहेत. हे काय चालले आहे या जिल्ह्यात? आता पहिली लढाई लोकसभेची आहे. त्यामुळे ओबीसींचा खासदार झाला पाहिजे. आता कुणाच्या सतरंज्या उचलायच्या नाहीत. आपण ‘होलसेल’ असल्याने विविध ‘सेल’चे राजीनामे फेकून द्या आणि ओबीसींच्या चळवळीत सहभागी व्हा. ओबीसी एक झाल्यास मराठ्यांचा आमदारच काय, त्यांचा सरपंचही होणार नाही,” असे प्रकाश शेंडगे म्हणाले.