रत्नागिरी येथील प्रख्यात हार्मोनियम, ऑर्गनवादक मधुसूदन लेले (वय 38) यांचे अल्पशा आजाराने काल (ता. 8) रात्री गोळप येथे राहत्या घरी निधन झाले. महिन्याभरापूर्वी तबलावादक मिलिंद टिकेकर यांचे निधन व आता लेले यांच्या निधनाने रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. रत्नागिरीसह मुंबई, पुण्यातील कलाकारांनी लेले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करून ही धक्कादायक बातमी आहे, असे संदेश येथील कलाकारांना पाठवले आहेत.
लेले यांनी 2002 मध्ये रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रात एंट्री केली. अल्पावधीतच त्यांनी नाव कमावले. 2008 नंतर खल्वायनच्या मासिक संगीत मैफलींमध्ये ते संगीतसाथ करायचे. लेले यांनी हार्मोनियमचे सुरवातीचे शिक्षण विजय रानडे, चंद्रशेखर गोंधळेकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांनी प्रख्यात ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर यांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्यांचे ते पट्टशिष्य झाले. अगदी दोन वर्षांपूर्वी पं. बोरकर यांचे निधन होईपर्यंत लेले त्यांच्याकडे शिकायला जात होते.
लेले यांनी आतापर्यंत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर, आनंद भाटे, विघ्नेश जोशी, मंजुषा कुलकर्णी- पाटील, जयतीर्थ मेवुंडी, विजय कोपरकर आदींना मैफलींमध्ये यांनी संवादिनी साथ केली होती. ‘कीर्तनसंध्या’मध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनाही साथ केली. ते अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.
खल्वायन संस्थेच्या अनेक संगीत नाटकांमध्ये लेले यांनी ऑर्गनसाथ केली. संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ आणि संगीत ताजमहाल या नाटकांसाठी त्यांना वादनाचे बक्षीस प्राप्त झाले. लेले यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगी, बहिण, आत्ते असा परिवार आहे.