(मुंबई)
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा मोठा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माणूस कसा आहे, यासाठी ते ज्या भागातून येतात तेथे फोन लावला. तेथील स्थानिक लोकांनी सांगितले की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. हे वंशज कोणाचे, नावं कोणाला ठेवतात आणि विशेष म्हणजे सरकार असल्या घाणेरड्या लोकांना खुलेपणानं फिरू देतात.
दुसरीकडे संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले. वास्तविक भिडेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे असंच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरेल. १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला, तर याला जबाबदार गृहखातं,पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
“हे लोक निर्लज्जासारखे वागत आहेत. पोलिसांनी संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे. त्यांना अटक का होत नाही? त्यांनी काहीही बरळायचं, महात्मा गांधी, महात्मा फुलेंचा अपमान करायचा. साईबाबांना काहीतरी बोलायचं, पंडित नेहरूंबद्दल काही तरी बोलायचं आणि हे काय दुधाने धुतले आहेत का?” असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विचारला. पंडित नेहरूंचं देशासाठी नखाइतकंही योगदान नाही, असं संभाजी भिडे म्हणतात, मग यांनी काय योगदान दिलं? नेहरू देशासाठी ११ वर्षे तुरुंगात होते. अशा व्यक्तीला नावं ठेऊन हे तरुणांची माथी भडकावत आहेत. तरुणांची पिढी बरबाद करण्याचं हे कारस्थान आहे, असे त्या म्हणाल्या.
महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबाबत असं विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. भिडे गुरुजी असो वा कुणीही अशी विधाने करू नये. याबाबत जी काही कारवाई आहे ती राज्य सरकार करेल, महात्मा गांधींचे अपमान सहन करणार नाही, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना दिला आहे.
महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. भिडेंच्या या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यात अनेक ठिकाणी भिडेंचा तीव्र निषेध केला जात आहे. यावर आता भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी भिडेंचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही – भुजबळ
छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही. खरे म्हणजे तो मनोहर भिडे आहे. आंब्याच्या संदर्भात वक्तव्य होते, त्यावर आम्ही कोर्टात गेलो आहे. मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी कुणालाही महात्मा गांधींच्या बाबतीतले हे वक्तव्य आवडणारे नाही. भिडेंवर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे. नेहरूंच्या वडिलांनी सगळं देशासाठी दान केले होते. स्वतः नेहरू साडे अकरा वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी माहित नव्हतं, स्वातंत्र्य मिळेल की नाही. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर भलामन करू नका, स्तुती करू नका मात्र अपमानही करू नका. आम्ही स्वतः भिडेंच्या विरोधात कोर्टात आहोत. पण कोर्टात तारीख मिळत आहे. भिडेंचे डोके ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही, अशी कठोर प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.