(पुणे)
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्याविरोधात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लवकरच लवकर भिडेंवर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तुषार गांधींनी सांगितले की, संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळे बोलतात. संभाजी भिंडेंनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला. त्यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडे यांनी आतापर्यंत अनेकदा महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. अब्रूनुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे, याबाबतचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली आहे, असे तुषार गांधींचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले.
संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तुषार गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “संभाजी भिडे यांनी गांधी परिवारावर लांच्छन लावलं आहे. त्यामुळं मला स्वतःला देखील अत्यंत दुःख झालं आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या विरुद्ध आम्ही ही तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही. तर महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार आहे. करमचंद गांधी त्यावेळी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. करमचंद गांधी एक दिवस त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले. त्यानंतर त्या मुस्लिम जमीनदाराने रागात करमचंद गांधींच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले. त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहेत.”