(खेड / भरत निकम)
संपूर्ण कोकणासह जवळपास महाराष्ट्रभर गांजासारखा अमली पदार्थांचा पुरवठादार खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात खेड पोलिसांना शरण आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे अशा बहुतांश जिल्ह्यात गांजा पुरवठा करतो. संतोष पुंडलिक काळे असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील असून संपूर्ण कोकणातील जिल्हा जिल्ह्यातील तालुक्यात व्यावसायिकांना गांजा उपलब्ध करुन देत आहे.
खेड तालुक्यातील लवेल येथील अनिल शिवराम चव्हाण याच्याकडे काही महिन्यांपूर्वी पोलिस पथकाने धाड टाकून गांजा जप्त केला होता. या धाडी नंतर तपास सुरु असताना पंढरपूर येथील संतोष पुंडलिक काळे हा अनिल याला गांजा पुरवत होता. त्या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून संतोषचे नाव नोंदवले होते. गुन्ह्यात तपाससाठी तो पोलिसांना गरजेचा असताना त्याच्या तपासाकरिता पोलिस पथके पंढरपूर, सोलापूर, पुणे येथे सापळा रचून होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचे राज्यभरातील विविध तालुका पातळीवर चांगले नेटवर्क आहे.
तो ज्या भागात गुन्हा दाखल झाला. तिथं दुसऱ्या टिममार्फत गांजा पुरवठा करत होता. तो वारंवार पोलिसांच्या जाळ्यातून स्वतःची सुटका करुन घेत असे. त्याने जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय, खेड येथे चार महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, युक्तिवाद करताना पोलिस सबळ कारणे देत अर्ज फेटाळला जाईल, एवढी व्यवस्था करीत होते. तद्नंतर तो मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनाचा अर्ज देऊन प्रयत्न करीत होता. मात्र, खेड पोलिस गुन्ह्यातील तपासकामी त्याचा ताबा महत्वाचा असल्याचे प्रत्यक्ष सांगत होते. शेवटी सर्व अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेले.
मंगळवारी, तो खेड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर दाखल झाला आणि त्याने न्यायालयात खेड पोलिसांकडे शरणागती पत्करली. पोलिसांनी न्यायालयात अमली पदार्थ विक्रीच्या तपासकामी संतोष काळे याला पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. संतोष हा रत्नागिरीसह रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात गांजा पुरवठा करतो. असा नामांकित गांजा क्षेत्रातील तस्कर खेड पोलिसांच्या हाती लागला असल्याने पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी वर्गाचे जिल्ह्यासह कोकणातून कौतुक केले जात आहे. सोलापूरचा कुविख्यात गांजा पुरवठादार संतोष काळे याच्याकडून गांजा विक्रीची आणखीन माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गांजाचे पुरवठादार यांचे धाबे दणाणले आहेत.
खेडमध्ये गांजासह एमडी मिळतोय
खेड शहरात गांजा, चरस आणि एमडी हा अमली पदार्थ तरुणांना शहरात सहजपणे उपलब्ध होत आहे. भोस्ते, भरणे, सुकिवली, खाडीपट्टा भागात विविध ठिकाणी गांजा खूलेआमपणे विक्री होत आहे. तर चायनीज सेंटरचे कामगार, युपी-बिहारी वास्तव करत असलेल्या भागातही गांजा सहज मिळतो असे समजते. याचाही तपास पोलिस पथकाने करावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.