(छत्रपती संभाजीनगर)
जुनी पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करुन देखील संपावर गेलेले कर्मचारी आपल्या भूमिकेवर कायम आहेत. त्यामुळे अखेर प्रशासनाने संपावर गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपावर गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी थेट नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे. तसेच संपावर गेलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना या नोटीसमधून देण्यात आल्या आहेत.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. तर पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले असून, संप मागे घेण्याचं आवाहन केले होते. मात्र असे असताना देखील संपकरी निर्णय होईपर्यंत संप चालूच ठेवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे अखेर प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. तसेच इतर प्रशासकीय कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांना देखील नोटीस पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.